Pan India Marathi movie After Operation London Cafe
दीपक राणे फिल्म्सच्या बहुभाषिक फिल्मचं सर्व स्तरातून कौतुक
सेलिब्रिटींसह नेटक-यांचा ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’च्या पोस्टरला चांगला प्रतिसाद
दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आले. या सिनेमाच्या पोस्टरला सर्वस्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कन्नड अभिनेता कवीश शेट्टीचा डॅशिंग लूक सगळ्यांनाच पसंत आला. त्या शिवाय एक मराठी सिनेमा इतर भाषेतही प्रदर्शित होतो आहे याचे कौतुकही होत आहे.
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी निर्माते दीपक पांडुरंग राणे यांच्या या वेगळ्या वाटेचं कौतुक केले आहे. अभिनेता, एड गुरू भरत दाभोळकर, अभिनेत्री अश्विनी भावे, दिग्दर्शक समित कक्कड, गायिका प्रियांका बर्वे आणि सावनी रविंद्र, या शिवाय सोनाली खरे, ऐश्वर्या नारकर, तेजस्विनी पंडित, संदीप पाठक, अक्षया नाईक, पल्लवी सुभाष, दीप्ती देवी यांनी सोशल मिडीयावर सिनेमाला सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या.
हे पोस्टर सोशल मिडीयावर पोस्ट केल्यानंतर नेटक-यांकडूनही याचे स्वागत करण्यात आले. मराठी प्रेक्षक वेगवेगळे विषय पाहायला उत्सुक असतो हे विविध प्रतिक्रीयांमधून समोर आले. नेहमी तमिळ, तेलगु सिनेमा आपण आपल्या इथे पाहातो. आता आपला मराठी सिनेमा इतर भाषेतही दाखवला जाणार याचेही स्वागत मराठी प्रेक्षकांनी केले आहे.
दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीचा ‘आफ्टर ऑपरेशन लंंडन कॅफे’ हा सिनेमा मराठी आणि कन्नड भाषेत चित्रीत झाला आहे. तर हिंदी, तमिळ, तेलगु, मल्याळम या भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कन्नड कलाकार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी आणि मराठीतील शिवानी सुर्वे, विराट मडके या कलाकारांचा समावेश आहे.
अनेक सुपरहिट मराठी सिनेमांची निर्मीती केल्यानंतर निर्माते दीपक पांडुरंग राणे ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा सिनेमा घेऊन आले आहेत. या बद्दल सांगताना दीपक राणे म्हणतात,’’दाक्षिणात्य प्रादेशिक सिनेमांनी त्यांच्या सीमा कधीच ओलांडल्या आहेत. मराठी सिनेमाही आपल्या सीमा ओलांडू शकतो. मराठी सिनेमा विषयी कुतुहल आणि कौतुक सर्वच सिनेसृष्टीत आहे. नवनवीन विषय हाताळण्यात मराठी सिनेमा कुठेच मागे नाही. त्यामुळेच आपणही आपला सिनेमा वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित केले पाहिजेत. त्यामुळे मराठी सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.”
दीपक पांडुरंग राणे यांच्यासोबत विजय शेट्टी आणि रमेश कोठारी यांनीही आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेची निर्मीती केली आहे. हा सिनेमा २०२२मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.