COVID 19 Daily Update Press Release:

COVID 19 Daily Update Press Release:

unnamed

रसायन आणि खते मंत्रालय

कोविड -19 मुळे देशभरात लॉकडाऊन असतानाही शंभर टक्के क्षमतेने खत प्रकल्प सुरू ; ‘एनएफएल’कडे शेतकरी बांधवांना देण्यासाठी खतांचा पुरेसा साठा, ‘एलएफएल’ शेतक-यांना आवश्यक तेवढा युरीया देणार

Posted On: 14 APR 2020 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020

भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एनएफएल म्हणजेच राष्ट्रीय खते मर्यादित कंपनी ही एक आघाडीची खत निर्मिती करणारी कंपनी आहे. देशामध्ये सध्या कोविड-19मुळे लॉकडाऊन सुरू असतानाही शेतकरी बांधवांच्या आवश्यकतेनुसार त्यांना खतांचा पुरवठा करीत आहे.

‘एनएफएल’च्या खत निर्मितीविषयी या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज मिश्रा यांनी आज प्रकल्पाच्या कामाची माहिती दिली. कंपनीच्यावतीने नानगल, भटिंडा, पानिपत इथल्या प्रत्येकी एका आणि विजयपूर इथल्या दोन अशा एकूण पाच खत प्रकल्पांमध्ये 100 टक्के क्षमतेने खतनिर्मिती सध्या सुरू आहे. या पाच प्रकल्पांमध्ये प्रतिदिनी 11 हजार मेट्रिक टन खताची निर्मिती केली जाते. तसेच हे खत विक्रीसाठी बाजारपेठेत पॅकींग करून बाहेर पाठवले जाते.

unnamed (1)

आगामी काळात  शेतकरी बांधवांना खताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही प्रकल्पाचे कामकाज सुरू ठेवून  त्यांच्यापर्यंत वेळेवर खते पोहोचविणे म्हणजे सरकारची शेतकरी बांधवांविषयी असलेली वचनबद्धता पूर्ण करणे आहे. सध्याच्या काळात खतांचे  कारखाने सुरू ठेवणे ही एक यशोगाथाच आहे. शेतक-यांची गरज लक्षात घेवून ‘एनएफएल’ सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.

भारत सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत देशातले खतांचे कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे कृषी क्षेत्राला लॉकडाऊनची झळ बसणार नाही. तसेच शेतकरी बांधवांना आगामी खरीप हंगामामध्ये पुरेशी खते मिळू शकणार आहेत.

सर्व खत प्रकल्पांमध्ये खतांच्या पोत्यांनी मालमोटारी भरणे, तसेच तो माल उतरवणे त्यांचे वितरण करणे अशी कामे करताना कोविड-19चा प्रसार होवू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले आहेत. यासाठी विशेष कृती दलाची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सर्व प्रकल्पांच्या आवारामध्ये कामगार, श्रमिक, कर्मचारी वर्ग यांना मास्क दिले मास्क देण्यात आले आहेत. तसेच त्यांना वारंवार हात धुण्यासाठी सुविधा केल्या आहेत.

एनएफएल कंपनी आणि त्यातील कर्मचारी वर्गाने गरजू लोकांना अन्न तसेच औषधे, जीवनावश्यक वस्तू यांचे वितरण केले आहे. कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठी  सरकारच्या वतीने जे प्रयत्न सुरू आहेत, त्यालाही खतं कंपनी मदत करीत आहे. या कर्मचारी वर्गानेही आपले योगदान पीएम-केअर्स निधीसाठी दिले आहे.

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Kor