Bardo Marathi Movie scores big at 67th National Film Awards!

Bardo Marathi Movie scores big at 67th National Film Awards!

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बार्डो’ चित्रपटाने मारली बाजी

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच दिल्लीत करण्यात आली. त्यात सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटांच्या यादीत ‘बार्डो’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला तर बार्डो सिनेमातील ‘रानं पेटलं’ या गाण्यासाठी गायिका ‘सावनी रविंद्र’ हिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे बार्डो चित्रपटाचे दिग्दर्शक भिमराव मुडे, निर्माते: ऋतुजा गायकवाड-बजाज, सहनिर्माते: रोहन – रोहन, निषाद चिमोटे, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार प्राप्त सावनी रविंद्र आणि बार्डो चित्रपटातील सर्व कलाकारांचे, तंत्रज्ञ यांचे  संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे.

बार्डो चित्रपटाचे दिग्दर्शक भिमराव मुडे राष्ट्रीय पुरस्काराबाबत भावना व्यक्त करताना म्हणाले, ”जेव्हा बार्डो चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्यावेळेचा आनंद, माझ्या भावना मी कृतीतून किंवा शब्दातून व्यक्त करू शकत नाही. ती बातमी कळताच माझे डोळे आपोआप मिटले गेले आणि  बार्डो साठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले, काम केले त्या सगळ्यांचे हसरे चेहरे डोळ्यासमोरून गेले. आम्हा सर्वांच हे स्वप्न होत, जे या पुरस्काराने पुर्ण झाले. काही गोष्टी मिळवण्यासाठी, काही वेळा काही गोष्टी गमवाव्या लागतात. आनंद तर झालाच त्याच बरोबर वाईट या गोष्टीच वाटतं की  प्रमुख सहायक कलादिग्दर्शक निलेश मोरे आणि अभिनेता कुणाल बने हे आमच्यात आनंद साजरा करण्यासाठी हयात नाहीत. मी पहिल्यांदा महर्षी दयानंद महाविद्यालयातून नाट्यविभागातून अभिनय करायला सुरुवात केली तेव्हापासून ते व्यावसायिक नाटक,  एकांकिका , मालिका, लघुपट, ते बार्डो चित्रपटापर्यंत, माझे सगळे सहकारी, हितचिंतक, मित्र ही सगळी जडणघडण, यश-अपयश याचा ओझरता आढावा माझ्या मनात येऊन गेला. मग मी भानावर आलो! ज्या स्वप्नासाठी इतकी वर्ष आपण धावत होतो ते स्वप्न आज साकार झालं . बार्डो या सिनेमातून मी जी कथा मांडली आहे.. स्वप्न सापेक्षता.. (theory of Dream Relativity) ती साक्षात पूर्ण होताना दिसली. मी या सिनेमातून जी कथा सांगायचा प्रयत्न करतोय त्याचं जिवंत उदाहरण माझ्या आयुष्यात दिसलं आणि माझा आनंद द्विगुणीत झाला आहे आणि सोबतच जबाबदारी सुद्धा वाढली आहे.”

हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार रोहन-रोहन हे बार्डो चित्रपटाचे सहनिर्माते देखिल आहेत. ते बार्डो चित्रपटाविषयी सांगतात, ”बार्डो चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत या गोष्टीवर खरंतर विश्वासच बसत नव्हता. निर्माता म्हणून बार्डो हा आमचा पहिलाच चित्रपट आहे. आणि त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं म्हणजे सोने पे सुहागाच जणू! रान पेटलं हे गाणं श्वेता पेंडसे हिने लिहीले आहे, संगीत आम्ही केले होते. आणि याच गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार सावनी रविंद्र हिला मिळाला. त्यामुळे हे सर्व आमच्यासाठी स्वप्नवत होतं.”

बार्डो चित्रपटाची निर्माती रूतुजा गायकवाड-बजाज सांगते, ”मी याआधी वेगवेगळ्या विषयांवर लघुपट निर्मिती केले आहेत. निर्माती म्हणून बार्डो हा माझा पहिलाच चित्रपट आहे. खरंतरं बार्डोचे दिग्दर्शक भिमराव मुडे आणि रोहन-रोहन यांनी जेव्हा मला ही स्क्रिप्ट ऐकवली, त्याच क्षणी मी चित्रपट करण्यासाठी तयार झाले होते. आणि आता या चित्रपटाचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान होतोय जे अविस्मरणीय आहे.”

बार्डो चित्रपटाचे निर्माते निषाद चिमोटे बार्डोच्या निर्मितीविषयी म्हणाले, ”बार्डो चित्रपटाच्या निर्मीती प्रक्रियेत खूप काही शिकायला मिळालं. कारण बार्डो हा चित्रपट विज्ञान आणि कला या संकल्पनेतून तयार झाला होता. या चित्रपटाचा विषय फारच वेगळा आहे. तसेच हा विषय लोकांपर्यंत पोहचवला पाहिजे ही एकच गोष्ट सगळ्यांच्या मनात होती. आणि तसेच झाले. बार्डोला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बार्डो चित्रपटाच्या संपूर्ण टिमला मेहनतीचे फळ मिळाले.”

बार्डो चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय.