Address to the Nation by the Hon’ble President of India, Shri RamNath Kovind, on the eve of India’s 73rd Independence Day

Address to the Nation by the Hon’ble President of India, Shri RamNath Kovind, on the eve of India’s 73rd Independence Day

 

http://

भारत के राष्ट्रपति श्री राम नाथ कोविन्द का तिहत्तरवें स्वाधीनता दिवस की पूर्वसंध्या पर राष्ट्र के नाम संदेश

73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपतींनी देशाला उद्देशून केलेले भाषण

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2019

माझ्या  प्रिय देशवासियांनो,

नमस्कार.

1.   73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. भारत मातेच्या सर्व लेकरांसाठी मग ते देशात असोत वा परदेशात, सर्वांसाठी, हा आनंदाचा दिवस आहे. स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या, त्याग आणि बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीकारकांचे आम्ही कृतज्ञतेने स्मरण करतो.

2. स्वतंत्र देश म्हणून 72 वर्षांची ही वाटचाल आता एका विशेष मुक्कामी आली आहे. काही आठवड्यातच 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आपण साजरी करणार आहोत. गांधीजी आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आणि सामाजिक विषमता दूर करण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मार्गदर्शकही होते.

3.  महात्मा गांधीजींच्या कार्यकाळातला भारत आणि आजचा भारत यातली परिस्थिती वेगळी असली तरीही, गांधीजींचे मार्गदर्शन आजही समर्पक आहे. आपल्यासमोर आज असलेली गंभीर आव्हानं त्यांनी आधीच जाणली होती. नैसर्गिक संसाधनांचा वापर विवेकाने केला तरच विकास आणि निसर्ग यांचा समतोल राखला जाईल, असं गांधीजी म्हणत. पर्यावरणाप्रती संवेदनशीलतेवर त्यांचा भर होता. निसर्गाशी मेळ राखत जगण्याची शिकवण त्यांनी दिली. आपल्या वंचित बांधवांसाठी कल्याणकारी योजना आखताना, सौर उर्जेचा नविकरणीय उर्जा म्हणून उपयोग करताना, गांधीजींचे हेच तत्व आपण आचरणात आणत आहोत.

4.  2019 हे वर्ष, भारतातले एक महान संत, गुरु नानक देव यांचं 550 वं जयंती वर्षही आहे. शीख धर्माचे संस्थापक म्हणून त्यांच्या प्रती, लोकांच्या मनात असलेला आदरभाव केवळ शीख बंधू-भगिनींपुरताच मर्यादित नाही तर भारत आणि जगभरातल्या करोडो लोकांपर्यंत व्यापक आहे. गुरु नानक देव यांच्या सर्व अनुयायांना या पवित्र जयंती वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रिय नागरिकहो,

5.  ज्या महान पिढीने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांना, स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय सत्तेचं हस्तांतरण अभिप्रेत नव्हते. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंबाचं जीवन आणि संपूर्ण समाज व्यवस्था उत्तम करणे हा त्यांचा उद्देश होता.

6.  या संदर्भात, जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी जे नुकतेच बदल करण्यात आले त्यामुळे इथल्या रहिवाशांना त्याचा मोठा लाभ होईल असा मला विश्वास आहे. त्यांनाही देशाच्या इतर भागातल्या नागरिकांना मिळणाऱ्या सर्व अधिकार आणि सुविधांचा लाभ घेता येईल. समानतेला प्रोत्साहन देणारे प्रगतीशील कायदे आणि तरतुदींचा उपयोग त्यांना करता येईल. ‘शिक्षणाचा अधिकार’ कायदा लागू झाल्यानं सर्व बालकांना शिक्षण सुनिश्चित होईल. माहितीचा अधिकार प्राप्त झाल्याने जनहिताशी संबंधित माहिती इथल्या लोकांना मिळू शकेल, पारंपरिक रूपाने वंचित राहिलेल्या वर्गासाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण आणि इतर सुविधा मिळू शकतील. तिहेरी तलाक सारख्या प्रथा नष्ट झाल्याने महिलांना न्याय मिळेल आणि भयमुक्त जीवन जगण्याची संधी मिळेल.

7.  यावर्षीच्या उन्हाळ्यात आपण सर्व देशवासीयांनी 17 व्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होऊन जगातली सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया संपन्न केली. यासाठी सर्व मतदारांचे मी अभिनंदन करतो. मोठ्या संख्येने आणि जोरदार उत्साहाने लोक मतदान केंद्रांवर आले होते. मतदानाचा अधिकारच नव्हे तर निवडणुकीच्या संदर्भातली आपली जबाबदारीही त्यांनी पार पाडली.

8.  प्रत्येक निवडणुकीत विकासाच्या प्रवासातल्या आपल्या एका नव्या अध्यायाचा प्रारंभ होतो. निवडणुकीच्या माध्यमातून, आपले देशवासीय आशा आणि विश्वास नव्यानं व्यक्त करतात, ज्याची सुरवात 15 ऑगस्ट 1947 ला सर्व देशवासीयांनी घेतलेल्या अनुभूतीने झाली होती. आपल्या गौरवशाली देशाला नव्या शिखरावर नेण्यासाठी प्रत्येकाने खांद्याला खांदा भिडवून एकत्र काम करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

9. संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांची सत्रे अतिशय सफल राहिली याचा मला आनंद आहे. आशयघन चर्चा आणि राजकीय पक्षांच्या परस्पर सहयोगाने अनेक महत्वाची विधेयकं मंजूर झाली. ही चांगली सुरवात पाहता, येत्या पाच वर्षात संसदेत कामकाज असंच सुरु राहील याचं हे द्योतक आहे, असा मला विश्वास आहे. राज्यांच्या विधानसभांनीही संसदेची ही प्रभावी कार्य संस्कृती बाणवावी असं आवाहन मी करतो.

10. लोकशाही दृढ करण्यासाठी संसद आणि विधानसभांनी आदर्श कामकाजाचं उदाहरण घालून दिलं पाहिजे. मतदारांनी टाकलेला विश्वास निर्वाचित सदस्यांनी सार्थ ठरवावा केवळ यासाठीच नव्हे तर राष्ट्र निर्माणाच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेत, प्रत्येक संस्था आणि प्रत्येक संबंधिताने एकजुटीने काम करण्याची आवश्यकता असते, यासाठी हे महत्वाचं आहे. एकजुटीने पुढे जाण्याच्या या भावनेच्या बळावरच आपल्याला स्वातंत्र्य प्राप्ती झाली. मतदार आणि लोक प्रतिनिधी, नागरिक आणि सरकार, समाज आणि प्रशासन यांच्यातल्या आदर्श भागीदारीतून राष्ट्र निर्माणाचे आपले अभियान अधिक बळकट होईल.

11. लोकांना सहाय्य करण्यात आणि त्यांना समर्थ बनवण्यात सरकारची महत्वाची भूमिका असते. त्याचप्रमाणे, आपल्या संस्था आणि धोरणकर्त्यांनी, नागरिकांनी दिलेल्या संदेशाला प्रतिसाद देत देशवासीयांच्या विचार आणि आकांक्षाचा सन्मान करणे महत्वाचं आहे. भारताचे राष्ट्रपती या नात्यानं  मला देशाच्या वेगवेगळ्या भागांना भेट देण्याची संधी प्राप्त होते, या दौऱ्यादरम्यान, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना भेटण्याची संधी मला प्राप्त होते. भारतीयांच्या रुची आणि  सवयी भिन्न असल्या तरी त्यांची स्वप्न समान आहेत. 1947 च्या पूर्वी सर्व भारतीयांचे लक्ष्य होते ते स्वातंत्र्य प्राप्तीचं. आज आपले लक्ष्य आहे ते विकासाची गती वाढवण्याचे, प्रभावी आणि पारदर्शी प्रशासनाचे, ज्यामुळे जनतेचे जीवन अधिक सुकर होईल.

12. जनादेशामध्ये, लोकांच्या आकांक्षा स्पष्ट दिसून येतात. या आकांक्षांची पूर्तता करण्यामध्ये सरकार आपली भूमिका बजावतं. मात्र, 130 कोटी भारतीय आपलं कौशल्य, प्रतिभा, नाविन्यता आणि उद्यमशीलता यांच्या माध्यमातून विकासाच्या  आणखी संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करू शकतात असं मला वाटतं. भारतवासियांमध्ये शतकानुशतकांपासून ही क्षमता आहे. आपल्या या क्षमतेच्या बळावरच आपला देश, हजारो वर्षांपासून आगेकूच करत आहे आणि आपल्या संस्कृतीची जोपासना होत आहे. भारताच्या प्रदीर्घ इतिहासात, आपल्या देशवासियांना, अनेकदा, आव्हानांचा आणि कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. अशा कठीण प्रसंगातही, आपला समाज, विपरीत परिस्थितीला तोंड देत पुढे जात राहिला. आता परिस्थिती बदलली आहे. सरकार, जनतेच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी, उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करत आहे. अशा अनुकूल वातावरणात आपले देशवासीय काय  साध्य करू शकतात याची कल्पना आपण करू शकतो.

13. देशवासीयांसाठी, सरकार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. गरिबांना घर, प्रत्येक घरात वीज, स्वच्छतागृह, पाणी या सुविधा देत सरकार पायाभूत ढाचा मजबूत करत आहे. प्रत्येक देशवासियाच्या घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी, शेतकरी बंधू-भगिनींसाठी सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि देशात कुठे पूर तर कुठे दुष्काळ या समस्यांवर प्रभावी तोडगा  काढण्यासाठी, जलशक्तीच्या सदुपयोगावर विशेष भर दिला जात आहे. जल सुरक्षा सुनिश्चित करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकाराबरोबरच आपणा देशवासीयांची महत्वपूर्ण भूमिका राहील. देशाच्या सर्व भागात दळण वळणाच्या अधिक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. यासाठी गावं  रस्तामार्गे जोडली जात आहेत आणि उत्तम महामार्ग बांधण्यात येत आहेत.रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुविधापूर्ण करण्यात येत आहे. मेट्रो रेल्वे द्वारे,शहरातल्या लोकांचा प्रवास सुलभ करण्यात येत आहे. छोटी शहरेही हवाई मार्गाने जोडण्यात येत आहेत. नवी बंदरं निर्माण करण्यात येत आहेत. त्याचबरोबर, रुग्णालयं, शिक्षण संस्था, विमानतळ, रेल्वे स्थानकं, बस स्थानकं, आणि बंदरे आधुनिक करण्यात येत आहेत. जनतेच्या हितासाठी, बँकिग सुविधा अधिक पारदर्शी आणि समावेशक करण्यात येत आहेत. उद्योजकांसाठी, कर प्रणाली आणि निधी उपलब्धता सुलभ करण्यात आली आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून, सरकार, लोकांपर्यंत, नागरी सुविधा आणि उपयुक्त माहिती पोहोचवत आहे.

14. सरकार, मोठ्या प्रमाणात, आरोग्य सुविधा प्रदान करत आहे. दिव्यांग जनांना, मुख्य प्रवाहाशी जोडण्याकरिता, त्यांना विशेष सुविधा देण्यात येत आहेत. महिला सबलीकरणासाठी, सरकारनं,कायदा आणि न्याय व्यवस्थेमध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत.देशवासीयांचं जीवन सुलभ करण्यासाठी, कालबाह्य कायदे रद्द करण्यात आले आहेत.

15. सरकारच्या या प्रयत्नांचा लाभ घेण्यासाठी, आपणा सर्व नागरिकांना जागरूक आणि सक्रीय राहायला लागेल.समाजाच्या हितासाठी आणि आपणा सर्व नागरिकांच्या हितासाठी, सरकारने उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधांचा आपण सदुपयोग करणं आवश्यक आहे.

16. उदाहरण द्यायचं झालं तर, ग्रामीण रस्ते आणि उत्तम दळणवळणाचा पुरेपूर लाभ तेव्हाच मिळेल, जेव्हा आपले शेतकरी बंधू-भगिनी त्याचा उपयोग करून बाजारपेठेत पोहोचतील आणि आपल्या शेत मालाला चांगला भाव मिळवतील. वित्त आणि महसूल क्षेत्रात केलेल्या सुधारणा आणि व्यापार नियम सुलभ करण्याचे लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा, आपले छोटे स्टार्ट- अप आणि मोठे उद्योग याचा उपयोग करून  प्रामाणिक उद्योग आणि शाश्वत रोजगार निर्माण करतील.प्रत्येक घरात स्वच्छतागृहाचा आणि पाणी उपलब्ध करून देण्याचा फायदा तेव्हाच मिळेल, जेव्हा या सुविधांचा वापर करत आपल्या माता-भगिनींचे सबलीकरण होऊन त्यांची प्रतिष्ठा वाढेल. घराच्या कक्षेतून बाहेर येऊन आपल्या आकांक्षाची त्या पूर्तता करतील, त्यांना त्यांच्या इच्छेनुसार आपले जीवन जगण्याचं स्वातंत्र्य राहील, घर सांभाळणे किंवा नोकरदार महिला म्हणून, व्यावसायिक म्हणून आपलं भाग्य त्या स्वतः घडवतील.

17. समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठीच्या या पायाभूत संरचनांचा सदुपयोग करणं, त्याचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. या पायाभूत सुविधा आपणा भारतवासियांच्या आहेत, आपल्या  सर्वांच्या आहेत कारण  ही राष्ट्रीय संपत्ती आहे. राष्ट्रीय संपत्तीच्या  रक्षणाची सांगड  स्वातंत्र्य रक्षणाशी आहे. आपल्या  सशत्र दल, अर्धसैनिक दल आणि पोलीस दलातले शूर जवान आणि शिपाई, देशात कायदा-सुव्यवस्था कायम राखताना आणि सीमांचे रक्षण करताना  आपल्याला जे  देशप्रेम आणि दृढ  निश्चय दिसून येतो, तीच भावना जेव्हा आपले कर्तव्यनिष्ठ नागरिक, राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करतात तेव्हा प्रतीत होते. समजा एखादी बेजबाबदार व्यक्ती, रेल्वे किंवा इतर सार्वजनिक संपत्तीवर दगड मारून, किंवा त्याचं नुकसान करण्याच्या बेतात आहे, आणि आपण त्याला त्यापासून रोखलं तर आपण देशाच्या मौल्यवान संपत्तीचं रक्षण करत असतो. यावेळी आपण कायद्याचं पालन तर करत असतोच त्याच बरोबर आपल्या अंतःप्रेरणेला अनुसरत जबाबदार नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्यही निभावत असतो.

प्रिय नागरिकहो,

18. आपण जेव्हा देशाच्या समावेशक संस्कृतीविषयी बोलतो, तेव्हा आपण हेही पाहिलं पाहिजे की आपले परस्परांशी संबंध कसे आहेत. दुसऱ्या व्यक्तीने आपल्याशी आदराने वागावं अशी आपली अपेक्षा असते तसाच आदर आपण सर्वाना दिला पाहिजे.भारताचा समाज नेहमीच, शांत, सरळ आणि ’जगा आणि जगू द्या’ या तत्वाला अनुसरत आला आहे. भाषा, पंथ, प्रांत याचा भेदभाव न करता आपण परस्परांचा आदर करत आलो आहोत. हजारो वर्षांच्या इतिहासात, भारतीय समाज, दुर्भावनेनं अथवा पूर्वग्रहानं वागल्याचं उदाहरण दुर्मिळच आढळेल. सलोख्यानं, एकोप्यानं, बंधुभावानं राहणे,सदैव सुधारणा आणि समन्वयावर भर देणे, हा आपल्या वारसा आणि इतिहासाचा भाग आहे. आपलं भविष्य घडवण्यात याची प्रमुख भूमिका आहे. दुसऱ्याचे चांगले विचार आपलेसे करून आपण आपल्या उदारतेची नेहमीच प्रचीती दिली आहे.

19. सहकार्याची हीच भावना आपल्या राजनैतिक संबंधातुन प्रतीत होते. आपल्याकडे असलेले अनुभव सहयोगी देशाला सांगण्यात आपल्याला आनंदच होतो. देश-विदेशात आपण कुठेही असलो तरी भारताची ही सांस्कृतिक मुल्ये आपल्यात सदैव वसत राहतील.

20. आपला देश हा युवकांचा देश आहे. आपल्या समाजाला आकार देण्यात युवकांचा पुढाकार वाढत आहे. क्रीडा क्षेत्रापासून ते विज्ञानापर्यंत, ज्ञानाचा शोध ते कौशल्यापर्यंत अनेक क्षेत्रात आपल्या युवकांच्या प्रतिभेची छाप दिसून येत आहे. युवकांच्या या उर्जेला योग्य दिशा देण्यासाठी, देशातल्या विद्यालयात, जिज्ञासा जागृत करण्यासाठी पोषक वातावरणाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. आपल्या मुला- मुलींसाठी आणि भावी पिढीसाठी  ही अमुल्य भेट ठरेल. त्यांच्या आशा-आकांक्षावर, विशेष लक्ष पुरवायचं आहे कारण त्यातूनच भविष्यातल्या भारताची झलक आपल्याला दिसणार आहे.

प्रिय  नागरिकहो,

21.  समाजातल्या दुर्बल घटकाप्रती आपली संवेदनशीलता भारत सदैव जपेल आपली प्राचीन मूल्य, आपले आदर्श कायम राखेल आणि शौर्याची परंपरा सुरु ठेवेल याचा मला विश्वास आहे. ज्ञान आणि विज्ञानाच्या बळावर चंद्र आणि मंगळावर पोहोचण्याचे सामर्थ्य  आपण भारतीय बाळगून आहोत. निसर्ग आणि जीवसृष्टी साठी प्रेम आणि करुणेचा भाव, हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. जगातल्या तीन  चतुर्थांश वाघांसाठी आपण सुरक्षित आश्रय स्थान पुरवलं आहे.

22.आपल्या स्वातंत्र्य चळवळीला स्वर देणारे थोर कवी, सुब्रम्हण्य भारती यांनी शंभर वर्षापूर्वी भावी भारताचं जे कल्पनाचित्र रेखाटलं होते ते आज आपल्या प्रयत्नातून वास्तवात साकार होताना दिसत आहे.त्यांनी म्हटलं होते:

मंदरम् कर्पोम्, विनय तंदरम् कर्पोम्,

वानय अलप्पोम्, कडल मीनय अलप्पोम्।

चंदिरअ मण्डलत्तु, इयल कण्डु तेलिवोम्,

संदि, तेरुपेरुक्कुम् सात्तिरम् कर्पोम्॥

अर्थात..

आम्ही शास्त्र आणि विज्ञान दोन्ही आत्मसात करू,

आम्ही आकाश आणि महासागर दोन्हींचा ठाव घेऊ,

आम्ही चंद्राच्या रहस्याची उकल करू,

आम्ही आपले मार्गही स्वच्छ राखू,

प्रिय नागरिकहो,

23. आपली समावेशक संस्कृती, आपले आदर्श, आपली जिज्ञासा आणि बंधुत्वाची भावना सदैव कायम राहो, या जीवन मूल्यांसह आपणा सर्वांची आगेकूच सुरु राहो, अशी आकांक्षा मी बाळगतो.

24. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा शुभेच्छा.

धन्यवाद!

जयहिंद!

M.Chopade/DD/P.Kor

भारत सरकार

पत्र सूचना कार्यालय

मुंबई